Tuesday, 20 September 2022

स्वप्न बघायला शिकल्या शिवाय माणूस मोठा होत नाही. मा. प्रा. विनायक पवार

 सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार व अभिनेते मा. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी आज शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. 'लेखक आपल्या भेटीला'या सदराखाली त्यांनी महाविद्यालयातील मराठी विभागात भेट दिली. तत्प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी वरील विचार मांडले. ते पुढे म्हणाले की, जीवनात खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर माणसाने आनंदी रहायला शिकले पाहिजे. त्यासाठी कविता हे एक प्रेरणादायी स्त्रोत आहे. यावेळी त्यांनी'आजोबा', 'बाप'या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर एक प्रेमकविता ही सादर केली आणि वातावरण मिस्किल भावनांनी भरून गेले. शेवटी विद्यार्थ्यांनी विचार व भावनांचा मेळ घालून प्रयत्न केले तर यशाचे शिखर नक्कीच पार करु शकाल असेही त्यांनी सांगितले. 

अध्यक्षीय मनोगत मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, मा. विनायक पवार यांचे आपल्या संस्थेशी ऋणानुबंधाचे नाते आहे. एका सर्वसामान्य तांड्यावरुन आलेला माणूस चित्रपट गीतकार, अभिनेता व साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला असूनही त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काव्य लेखन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही सुध्दा चांगले लेखक होऊ शकेल. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ.उज्ज्वला पाटील यांनी करून दिले, तर आभार डॉ. दयानंद कराळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.