Tuesday, 16 June 2020

संतांची शिकवण काळाची गरज

        संतचरित्रे परमपवित्र रे सादर वर्णावी।असे संत नामदेवांनी लिहिले व त्यातून संतांबद्दलचा आदर व्यक्त केला.संत म्हणजे साक्षात देव. संत म्हणजे पृथ्वीवर वावरणारी परमेश्र्वराची प्रतिमा.म्हणून 'जगाच्या किल्ल्याचा संतांच्या विभूती'असा त्यांचा गौरव केला जातो.ते त्यांच्या ठिकाणी असलेल्या दया,क्षमा, परोपकार, कणवाळूपणा या गुणांमुळे च. आपल्या सहवासात आलेल्या लोकांचे दु:ख दूर करणे हा संतांचा धर्म, कारण संत हे नि:स्वार्थी भावनेने समाजाची सेवा करीत असतात. 'हे विश्वची माझे घर','बुडती हे जन देखवेना डोळा'अशी त्यांची वृत्ती असते. दु:खितांचे दु:ख निवारण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
       'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले','सर्व धर्म समभाव','प्राणीमात्रांवर दया', 'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा', मानवीयता,  निसर्गाचे महत्त्व, अशा अनेक गोष्टींची शिकवण त्यांच्या आचरणातून मिळते. ज्याची आजच्या समाजाला अत्यंत गरज आहे. आपल्या कर्तृत्वामुळे व चारित्र्य संपन्नतेमुळे असे संत अमर झाले आहेत.
       आज जागतिकीकरणामुळे माणूस स्वत:मध्येच गुरफटत चालला आहे.'मी'पणाची भावना वाढवल्यामुळे अहंकार, लोभ, मोह वाढून'आम्ही'हे शब्द तो विसरत चालला आहे. सुखासीनतेमुळे पैसा, प्रतिष्ठा यांच्यातच तो घुटमळत आहे. साध्या साध्या गोष्टींनी गैरसमज वाढून कर्तव्यापासून विचलित झाल्यामुळे त्याच्यात स्वार्थीपणा वाढत आहे. म्हणून अशा समाजाला कर्तव्याची व मानवीयतेची जाणीव करून देण्यासाठी आज संतांच्या विचारांची व शिकवणीची गरज आहे असे मला वाटते.

No comments:

Post a Comment